विमानाची चाके बाहेर अडकली! यशस्वी लँडींगनंतर प्रवाशी सुखरूप, अमित शहा यांच्या आगमनापूर्वी पुणे विमानळावरील थरकाप उडवणारी घटना

Foto
पुणे: पुणे ते गुवाहाटी दरम्यानच्या इंडिगोच्या विमानाचे, ज्यामध्ये प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण १९२ लोक होते, उड्डाणानंतर लँडिंग गिअर आत न गेल्यामुळे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. इंडिगोचे विमान ६ ई ०६२३ ने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड दिसून आला. वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला  कळवले की, विमानाचे लँडिंग गिअर आत न जाता बाहेरच राहिले आहे. ही घटना चिंतेची ठरली, कारण काही तासांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे या विमानतळावर आगमन होणार होते.

या आपत्कालीन परिस्थितीमुळे पुणे विमानतळावर काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे विमानाचे सुखरूप आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, विमानामधील सर्व १९२ जण सुखरूप आहेत. 

या धक्कादायक स्थितीची माहिती मिळताच, पुणे विमानतळ प्रशासनाने एअर ट्रॅफिक कंट्रोल, इंडिगो आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. भारतीय हवाई दलाने  पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर केली, त्यानंतर सर्व निर्धारित आपत्कालीन कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आल्या. प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन पथकांना सतर्क ठेवण्यात आले. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून, लँडिंग गिअरची स्थिती तपासण्यासाठी विमान धावपट्टीवरून कमी उंचीवरून नेण्यात आले. त्यानंतर, सकाळी ९:०४ वाजता विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान क्रमांक ६ ०६२३ पुण्यातून गुवाहाटीच्या दिशेने उड्डाण करत होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची चाके (लँडिंग गिअर) नेहमीप्रमाणे आत न जाताच बाहेरच अडकून राहिल्याचं पायलटच्या लक्षात आलं. हा तांत्रिक बिघाड अत्यंत धोकादायक असल्याने विमानाला पुन्हा पुणे विमानतळावरच उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

विमान उतरल्यानंतर, निर्धारित आपत्कालीन कार्यपद्धतीनुसार तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिकांनी विमानासोबत बे क्र. ७  पर्यंत मार्गक्रमण केले. विमान सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर,  सकाळी ९:१० वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलने पूर्ण आपत्कालीन स्थिती मागे घेतली. त्यानंतर एअरब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. प्रवाशांचा गुवाहाटीपर्यंतचा प्रवास पूर्ण व्हावा यासाठी, इंडिगोतर्फे बेंगळुरूहून पुण्यासाठी दुसरे विमान उपलब्ध करून दिले जात होते. या दरम्यान पुणे विमानतळ प्रशासनाने भारतीय हवाई दल, एअर ट्रॅफिक कंट्रोल, इंडिगो आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयातून त्वरित आणि सुव्यवस्थित प्रतिसाद दिला, ज्यामध्ये प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते.

हवाई दलाकडून फुल इमर्जन्सी घोषित
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाकडून पुणे विमानतळावर तत्काळ फुल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. विमानतळावर अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या. सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी या विमानाचे पुणे विमानतळावर अत्यंत सुरक्षितरीत्या लँडिंग करण्यात आले. विमानामध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून एकूण १९२ जण होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासानंतर, इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांचा पुढील प्रवास सुरळीत पार पाडण्यासाठी बंगळुरूहून एका पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.